सुमित दादा यांचे युवा छावणी 2022 बद्दलचे अनुभव
निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीला तोंड देत साने गुरुजी स्मारकातील यशस्वी झालेली युवा छावणी 2022.
मागील दोन वर्षांपासून आतुरतेने वाट पाहायला लावणारी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची युवा छावणी 1 मे ते 8 मे 2022 या कालावधीत पार पडली. या वर्षीच्या छावणी ची थीम होती *(तापमान वाढ,हवामान बदल, जैवविविधता,शाश्वत विकास विपुल रोजगानिर्मिती)* ही थीम जशी आपल्याला आपल्यावर ओढवलेल्या संकटाची चाहूल देत होती व त्याची जाणीव निर्माण करून देत होती त्याच प्रमाणे स्मारकाचे अध्यक्ष संजय मंगला गोपाळ, राकेश सर सारखे नवखे मॅनेजर आणि माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला आणि मारोती, प्रफुल, वर्षा , पुरुषोत्तम, वैभव, प्रथमेश, अमोल, या कार्यकर्त्यांना छावणीच्या नियोजनासंदर्भातील, वक्त्यासंदर्भात येणाऱ्या अडचणीची चाहूल देत होता.
शिबिराच नियोजन करत असताना बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या. ज्यात जेवणाचा मेनू, वक्त्यांना लागणाऱ्या गोष्टींची तयारी, निवासव्यवस्था किराणा इत्यादी.. पण दोन सर्वात महत्वाचे प्रश्न उभे होते छावणीचा मांडव आणि पिण्याचं पाणी. दोन वर्षांपासून कोणतेही शिबीर नसल्यामुळे स्मारकात मांडव घातला गेला नव्हता. पण आता अचानक छावणी घ्यायची म्हटल्यानंतर मांडवाची आठवण झाली.. स्मारकाची छावणी मांडवाशिवाय... शक्यच नाही.
20 एप्रिल पासून मांडवाच्या तयारीला लागलो.. नवीन बांबू नवीन मटेरियल या सगळ्याचा खर्च पाहता मांडवाचा बेत काही फिक्स होत नव्हता.. काही जणांनी 80 रु बांबू सांगितला तर काहींनी 100 रु, आणि असे 50 ते 60 बांबू लागणार हे दिसून येत होतं.. आणि काही दिवसांवर पावसाळा येत असल्याने नवीन बांबू टाकून परत त्याच नुकसान होऊ द्यायच नव्हतं..
मग काय म्हणतात ना *जुनं ते सोनं* या म्हणीप्रमाणे जुने लोखंडी पोल, बांबू, आपल्या स्मरकातील बेटावर असलेले बांबू या सगळ्यांची जमवाजमव दोन तीन दिवसात स्मारकातील कार्यकर्त्यांनी केली आणि नवीन मांडवाच्या तयारीला सर्वजण जोमाने लागले. आणि या सगळ्यांपासून नवीन मांडव तयार झाला सुद्धा.. या सगळ्यात खूप महत्त्वाचा वाटा होता तो सीताराम मामा सखाराम मामा राजेश दादा या सगळ्यांचा.. पुढील तीन दिवसात रोज शेण गोळा करून सारवासारव करणे, पाणी मारणे असं सगळं काम आपल्या महिला कार्यकर्त्यांनी नेटाने चालू ठेवलं. सकाळी सहा वाजेपासून गावातील लोकांच्या गोठ्यात जाऊन शेण बाजूला काढायला सांगून ते सगळं गोळा करणं सोपं काम नव्हतं .. रोजच्या 4 ते 5 शेणाच्या गोण्या तयार करून ठेवणं हे राजेश दादा शिवाय इतर कोणाला जमलंच नसत...
आता महत्वाचा प्रश्न होता तो पाण्याचा. कॅम्प दोन दिवसावर असतानाच पाण्याची जुनी लाइन बंद झाली व नवीन लाइन सुरू झाली.. याची खबर आम्हाला शिबिराच्या एक दिवस अगोदर म्हणजे 29 ला झाली. पिण्याचं पाणीच नसेल तर शिबीर कसं चालणार? हा मोठा प्रश्न होता. समजा पाणी घेता नाहीच आलं तर टँकर ची सोया केली होती, पण हे सलग 8 दिवस शक्य नव्हतं.. काहीही करून पाणी घ्यायला पाहिजे असं मनाशी ठरवून सतीश दादाकडून नंबर घेऊन स्मारकाच्या जुन्या प्लंबर ला फोन केले गेले. सामानाची जमवाजमव केली. नंतर लक्षात असं आलं की पाणी पुढे कॅन्टीन कडे घेऊन जाणारा लोखंडीपाईप च पूर्णपणे खराब झाला आहे.. आणि त्याची लांबी जवळ जवळ 20 फूट. आता काय करायचं हा प्रश होता..कारण एक पाईप साठी गाडी भाड्याने करू शकत नव्हतो आणि पाईप अखंड असल्याने कापू सुद्धा शकत नव्हतो..
छावणीसाठी कार्यकर्ता म्हणून पहिल्यांदाच आलेला पण स्मारकाला अगदी जवळून पाहिलेला, इथल्या कामाबद्दल जाणून असलेला प्रफुल नुकताच आला होता. त्याला माझी अडचण सांगितली आणि तो लगेच *काहीच टेन्शन घेऊ नका राव* असं म्हणत लगेच तयार झाला.
दोघांनाही अश्यक्य वाटणारी गोष्ट 20 फुटाचा लोखंडी पाईप गोरेगाववरून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्कुटीवरून घेऊन स्मारकापर्यंत आणली. काहींना ही साधी गोष्ट वाटली असेल तर त्यांनी फक्त सुकलेला एक 20 फुटी बांबू स्कुटीवरून वळणावळणाच्या रस्त्यावरून आणावा. आमच्यासाठी ही साधी गोष्ट नव्हतीच..
त्यानंतर 100 लोकांचा 8 दिवसाचा किराणा तांदूळ आटा या सगळ्यांची जमवाजमव झाली आणि शिबिराची तयारी झालं असं वाटलं..
पण सतीश दादांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली की बेसिन ला तात्पुरता तरी आसरा करून घ्या. नाहीतर दुपारी ताट धुण्यासाठी इथं थांबता सुद्धा येणार नाही.. 30 तारखेला सकाळीच इतरांनी 4 दिवस लागतील मांडव तयार व्हायला असं सांगितलं असताना एक तासात बेसिन वरील मांडव तयार झाला. काही अश्यक्य गोष्टी शक्य करण्यात स्मरकातील लोकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे..
या सगळ्या तयारीच्या निमित्ताने महादेव दादांची खूप आठवण येत होती.. ते असते तर... असं भविष्य आम्ही रोज काम करताना रंगवत होतो.. पण त्यांचा सहवास आम्हाला मागील 4 वर्षात खूप काही देऊन गेला होता.. त्यामुळेच ते दोन्ही मंडप पाण्यासाठी केलेला खटाटोप हे सगळं हाताळण आणि काम करणं मला जमलंच नसत. याच कालावधीत मांडवात लाईट लावून घेणे डॉम मध्ये फॅन बसून घेणे, त्या अगोदर फॅन आणणे आशा अनेक गोष्टी एकाच वेळेस करण शक्य झालं
शिबिरादरम्यान आलेल्या असंख्य अडचणी होत्या. शिबिर सुरू असताना मधेच लागलेला वणवा, त्याला विझवण्यासाठी मुलांनी केलेली धडपड, वनव्यामुळे जळलेलं लाईट च वायर, त्यामुळे 5 तास गेलेली लाईट, कामगार दिनाच्या सुट्टीच्या दिवशी राजभर लाइनमन ने दाखवलेली तत्परता, पाहिले दोन दिवस स्वयंपाकाला कमी मानसं असलेला स्टाफ, त्यांना विद्यार्थ्यांनी केलेली मदत. किचन मध्ये पाहिले दोन दिवस राकेश सरांचं लक्ष, अधून मधून लागणार सामान आणण्यासाठी मला आणि प्रफुल ला बाजारात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या, शिबिराची सुरुवात चांगली होण्यासाठी विजय दिवाने दादा यांचे प्रयत्न, विद्यार्थ्यांचं शिबीर गोड व्हावं यासाठी आजी आणि माजी कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेलं स्वीट (उल्काताई, दिवाने सर, राकेश सर, वर्षा, वकील संघटना) आणि यात सर्वात महत्वाचं म्हणजे स्मारकाचे अध्यक्ष संजय सर यांनी दिलेला पूर्ण वेळ, संदेश दादा आणि राजेश सरांनी त्यांच्या पूर्ण बिझी शेड्युल मधून काढलेला वेळ,या सगळ्या छोट्या मोठया अडचणीना तोंड देत, आलेले प्रॉब्लेम सोडवत आणि मिळालेल्या लोकांचा पूर्ण सहभाग घेत हे शिबीर 8 दिवस चालू होतं.
स्वतःच सहा महिन्यांच छोटं बाळ घरी ठेऊन संपूर्ण वेळ ऑफिस सांभाळणारी सोनाली असेल किंवा
स्वतःच्या आजारपणाकडे थोडंस दुर्लक्ष करत गोळ्या खात शिबिरामध्ये मुलींसोबत राहण्यासाठी नंदुरबार वरून आलेली वर्षा असेल, किंवा चेन्नई ला निघालेला स्लीपर च तिकीट योगायोगाने ए.सी. मध्ये बुक झालेलं असताना तिकीट कॅन्सल करून शिबिरामध्ये पूर्ण वेळ देणारा आणि ज्याने एसी मध्ये कधीच प्रवास केलेला नाही असा चान्स सोडणारा मारोती असेल, किंवा जी. आर. एफ. मार्फत फिल्ड वरती असणारा प्रफुल आणि पुरुषोत्तम ज्यांनी फिल्ड आवश्यक असताना सुद्धा त्यांनी स्मारकासाठी दिलेला वेळ असेल, पुण्यातून आलेला वैभव असो किंवा सोलापूरचा अमोल आणि आपले इथले सगळे कर्मचारी आणि आपले बाकीचे ट्रस्टी आणि सहकारी या सगळ्या शिवाय या ही छावणी केवळ अश्यक्य होती...
हे सगळं सांगण्याचं कारण एकच की एखादं काम शोभून दिसत असेल किंवा कार्यक्रम छान पार पडला असेल तर सर्वांच्या लक्षात एक गोष्ट लक्षात यायला हवी की ते काम किंवा तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शेकडो अजानत्या लोकांचे हात असतात.. जे समोर कधीच येत नाहीत.. परंतु सगळं काम, सगळा कार्यक्रम त्यांनी स्वतःच्या हातावर सांभाळेल असतो... म्हणूनच आपण या शेकडो होताना विसरता कामा नये...
आपला
सुमित प्रतिभा संजय
#युवा_छावणी_2022
Comments
Post a Comment